सध्या सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय. ‘एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालंय. ते भारताचा भूभाग ओलांडून अरबी समुद्रात जाणार आहे, तेसुद्धा कर्जत-जामखेडमार्गे. त्याच्यामुळे मोठा धोका आहे, वगैरे, वगैरे…’ याबाबत लोकांमध्ये काहीसं कुतूहल, गैरसमज आणि भीतीसुद्धा आहे. हे सारं दूर करणं आवश्यक आहे. त्यासाठीच ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांचा हा खास लेख…

देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास झालाय. या काळात मुख्यत: पाऊस पडतो तो वादळी स्वरूपाचा. राज्याच्या अनेक भागात त्याचा अनुभव घेतच आहोत- सकाळपासून उकाडा आणि दुपारी, सायंकाळी किंवा रात्रीसुद्धा वादळी पाऊस; विजा-ढगांचा गडगडाट यांच्यासह! ही खरं तर मान्सून माघारी चाललाय याची लक्षणं.

चक्रीवादळ नव्हे, कमी दाबाचं क्षेत्र !

बंगालच्या उपसागरात सोमवारी (१२ ऑक्टोबर) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं. अशा कमी दाबाच्या क्षेत्रांमुळेच पावसाळ्यात देशात जास्तीत जास्त पाऊस पडतो. हे असंच एक क्षेत्र आहे. मात्र, ते चक्रीवादळ नाही. कारण चक्रीवादळाची तीव्रता खूपच जास्त असते. त्यातील वाऱ्यांचा वेग कमी दाबाच्या क्षेत्राच्या तुलनेत पाच-सहा पटीने जास्त असतो. त्यामुळे या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.

आताच्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारताच्या दक्षिण भागात तसेच, महाराष्ट्रातही काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हे क्षेत्र मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशात विशाखापट्ट्ण येथे जमिनीवर आलं. आज (बुधवार) हे क्षेत्र विशाखापट्टण- हैदराबाद – सोलापूर – पुणे – पालघर इथे असेल. त्यानंतर गुरुवारी (१५ ऑक्टोबर) अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय.

अरबी समुद्रात पोहोचल्यावर त्याला समुद्रावरील बाष्प मिळेल आणि त्याची तीव्रता आणखी वाढेल. त्यानंतर ते आणखी पश्चिमेला म्हणजे आफ्रिका खंडातील ओमानच्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करेल.

ही नक्कीच दुर्मीळ घटना…

हवामानाच्या नोंदींनुसार, ही नक्कीच दुर्मिळ घटना आहे. आतापर्यंतच्या इतिहास असं सांगतो की पाऊस देणारे चक्रीवादळ असो किंवा कमी दाबाचं क्षेत्र, ते क्वचितच भारताच्या एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात पोहोचतं. त्या दृष्टीने ही दुर्मिळ घटना आहे.

१९७७ चे चक्रीवादळ 

यापूर्वी चक्रीवादळाच्या बाबतीत असं घडलं होतं. ते १९७७ साल होतं. त्या वर्षी सौम्य स्वरूपाचं वादळ १२ नोव्हेंबरला निर्माण झालं. ते तामिळनाडूमधील नागापट्टण येथे जमिनीवर आलं. जमिनीवर आल्यावर त्याची तीव्रता कमी झाली. त्यानंतर ते तसेच पश्चिमेकडं सरकलं आणि दुसऱ्या दिवशी केरळ मार्गे अरबी समुदात दाखल झालं. समुद्रात पोहोचल्यावर त्याची तीव्रता वाढली आणि ते पुन्हा वळून दक्षिण भारतात दाखल झालं. त्यानंतर महाराष्ट्रापर्यंत आलं आणि मग २३ नोव्हेंबरला विरून गेलं.

कारण काय ?

असं घडण्याचं कारण म्हणजे सध्या मान्सूनचं सक्रिय क्षेत्र दक्षिणेकडं सरकलं आहे. मान्सूनच्या आगमनाच्या वेळी ते उत्तरेकडं सरकतं आणि तो माघारी निघून जाताना दक्षिणेकडं सरकतं. त्यामुळे ते दक्षिणेला आहे. या काळात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं. तसं ते निर्माण झालं आहे. कोणतंही कमी दाबाचं क्षेत्र किंवा अगदी चक्रीवादळ यांना समुद्रावर बाष्प मिळतं आणि त्यांची तीव्रता वाढत असते. पण जमिनीवर आल्यावर त्यांना बाष्प मिळत नाही. परिणामी, त्यांची तीव्रता कमी होते. अशा वेळी आताचं कमी दाबाचं क्षेत्र एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडं सरकणं दुर्मीळ आहे. कधी कधी अशा घटना घडत असतात. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने जमिनीवर बाष्प उपलब्ध झालं आहे, शिवाय त्याला इतरही कारणं असतील. त्यांचा अभ्यास व्हायला हवा !

याचा परिणाम

या घटनेचा परिणाम म्हणजे आपल्याकडं आणखी तीन-चार दिवस पाऊस कयम राहण्याची शक्यता आहे. मात्र, याची तीव्रताच मुळी कमी असल्याने ऑगस्ट महिन्यात पडला, तसा मोठा पाऊस अपेक्षित नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात, विशेषत: दक्षिण महाराष्ट्रात हलक्या – मध्यम स्वरूपाचा पाऊस (१० ते ३० मिलिमीटर) पडेल. काही ठिकाणी मान्सून परतत असताना पडतो, तसा वादळी पाऊसही पडेल. पण त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण त्याची तीव्रता मुळातच कमी आहे.