मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महायुतीकडून लक्षपूर्वक पावले टाकण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात महिला, शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. अजितदादांनी ताईसाठी म्हणजेच महिला मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.

मध्य प्रदेशात भाजपला दणदणीत विजय मिळवून देण्यात लाडली बेहना योजना महत्वपूर्ण ठरली. याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेसाठी दरवर्षी 45 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणाही अर्थमंत्री अजित पवारांनी केली. यानुसार पात्र महिलांना वर्षाला तब्बल  3 गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ 52 लाख कुटुबांना घेता येणार आहे. या अर्थसंकल्पात अजून एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. बचत गटाच्या निधीत तब्बल 15 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी 15 हजार रुपये निधी दिला जायचा. आता तो 30 हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच सरकारी रुग्णालयात स्तन, गर्भाशय चाचण्या मोफत होतील.  

विवाहित मुलींसाठी जी शुभमंगल योजना राबवण्यात येत होती त्या योजनेच्या निधीतही वाढ करण्यात आली आहे. हा निधी 10 हजारांवरुन 25 हजारांवर नेण्यात आला आहे. 25 लाख महिलांना यावर्षी लखपती दीदी करण्याचा  संकल्प महायुती सरकारनं केला आहे. राज्यात यावर्षी 10 हजार  पिंक रिक्षाही महिलांना देण्यात येणार आहेत. तसेच व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे.