टोप (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून सन २०१७, १८ हंगामातील देय असलेल्या रक्कमेपैकी १०७ रुपये प्रति मेट्रिक टन या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, छ. राजाराम साखर कारखाना २०१७-१८ या सालामध्ये तुटलेल्या उसाची एफारपीची रक्कम प्रतिटन २६९३ रुपये संपूर्णपणे आदा केलेली आहे. कारखान्याने ज्यादा दर म्हणून २०७ असे एकूण २९०० रुपये प्रति टन ऊस उत्पादकांना देण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. यापैकी २६९३ रुपये एफारपीची संपूर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आदा केली आहे. बाजारातील साखरेच्या चढ-उतारामुळे जादा दराची देय रक्कम देण्याची आर्थिक तरतूद झालेली नव्हती.
याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन २०७ रुपयांपैकी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १०७ रुपये आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जादा दराची रक्कम देण्याचे सभासदांना अभिवचन दिले होते. त्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे चेअरमन सर्जेराव माने आणि व्हा. चेअरमन वसंत बेनाडे यांनी सांगितले. तर दराबाबतचे प्रसिद्धीपत्रक कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी प्रसिद्धीस दिले आहे.