रायपूर : देशातील १२५ कोटी जनतेला जर दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य देशामध्ये पिकवायचे असेल, तर केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत कायदा पारित करावा, अन्यथा भविष्यात भूकबळीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. रायपूर येथे एम.एस.पी गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्तीसगड राज्यातील शेतकरी नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

शेतीमध्ये शाश्वत उत्पान्नाची हमी नसल्याने तसेच अस्मानी व सुल्तानी संकटामुळे दिवसेंदिवस शेतीक्षेत्रातून शेतकरी बाहेर पडू लागला आहे. देशातील शेतकरी हरितक्रांती नंतर जनतेला दोनवेळा पुरेल एवढे अन्नधान्याचे उत्पादन घेऊ लागला आहे. मात्र या पिकविलेल्या शेतीमालाला हमीभाव न मिळाल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणताच शेतकरी पिकांच्या हमीभावाबाबत समाधानी नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागल्याने कर्जाचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. हीच परिस्थती यापुढे राहिली तर देशामध्ये भूकबळीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

एम.एस.पी. गॅरंटीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही एम. सिंह म्हणाले, शेतकरी केंद्रीत योजनांची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे हक्क आणि सरकारचे कर्तव्य या दोन्हीची अमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. एम. एस. पी चा कायदा देशातील शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत देशभर ही चळवळ तीव्र करणार आहे. या कार्यशाळेस सरदार व्ही. एम. सिंह, राजाराम त्रिपाठी, विवेक त्रिपाठी यांच्यासह छत्तीसगड राज्यातील २४ विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.