औरंगाबाद : देशात लोकसभा  निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होणार आहे. एमआयएमनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुढील महिन्यात 13 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान होणार आहे.

मशालीत आग आहे. या आगीला संपवायचं आहे. हे या आगीने घरं जाळू इच्छितात. ही आग आपण विझवणार आहोत”असा टोला  ठाकरे गटाला मिळालेल्या मशालीच्या चिन्हावरून असदुद्दीन ओवैसींनी लगावला आहे. “20 वर्षांपासून हे बोलत होते की खान पाहिजे की बाण. आता यांचं काय निवडणूक चिन्ह आहे? जास्त फेकाफेकी केली तर हेच होतं. प्रत्येक निवडणुकीत खान-बाण केलं, मग निसर्गही म्हणाला घ्या. सगळं निघून गेलं. यांच्या हाती मशाल आली. पण मशालीपासून सावध राहा. मशालीत आग आहे. या आगीला संपवायचं आहे. हे या आगीने घरं जाळू इच्छितात. ही आग आपण विझवणार आहोत”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

चंद्रकांत खैरेंवर टीका करताना ओवैसी म्हणाले, “ते म्हणतात आम्ही हजारो कोटी घेतले. जरा तरी लाज वाटू द्या. तुम्ही भाजपामुळे निवडणूक जिंकून आलात. उद्या जर मोदी तुमच्याकडे बघून फक्त हसले, तरी तुम्ही औरंगाबाद विकायला तयार व्हाल. पण एक काम तर औरंगाबादकरांनी केलं. त्यांनी या माणसाला मुस्लिमांविषयी बोलायला भाग पाडलं. सगळे भाऊ-भाऊ आहेत असं बोलायला भाग पाडलं”.“आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजपा आणि अर्धी कॉंग्रेस असे साडेपाचजण इम्तियाज जलील यांच्याविरोधात लढायला आले आहेत”, असंही ओवैसी सर्वच पक्षांवर टीका करताना म्हणाले.