कोल्हापूर (प्रतिनिधी) : घर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने मोटरसायकल लंपास  केली. याप्रकरणी योगेश धोंडीबा दिंडे (वय ३९, रा. गंगाई लॉन, फुलेवाडी रिंग रोड, सध्या रा. गोवा) यांनी विवेक देसाई (रा. गांधीनगर) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोवा येथील तळगाव येथे राहणारे योगेश दिंडे याचे फुलेवाडी रिंग रोड येथील घराची विक्री करायची होती. त्यासाठी गांधीनगर येथील विवेक देसाई याने दिंडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटण्यासाठी कावळा नाका रोड जवळ बोलावून घेतले. त्यावेळी विवेक देसाई याने त्याचा भाऊ विक्रम देसाई हा दसरा चौक येथील एका बँकेमध्ये नोकरी करत असून त्याच्याकडून घर खरेदी साठी लागणारी रक्कम घेऊन येतो, असे सांगून विवेक देसाई यांनी योगेश दिंडे यांची मोटरसायकल मागून घेतली व त्यांने पोबारा केला. बराच वेळ ते आले नाहीत त्यामुळे योगेश दिंडे यांनी विवेक देसाई याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे योगेश दिंडे याने विवेक देसाई यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.