इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी-टाकवडे मार्गावर रात्रीच्या सुमारास गावातील काही तरुणांना एक निराधार व्यक्ती आढळून आली. तेथील युवासेना शहर अधिकारी सोन्या माळी, विशाल गायकवाड, ऋषिकेश भगत, अनिकेत जाधव आदी युवकांनी या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली असता ही व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असल्याचे समजले.

या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत या व्यक्तीची गावातील शाळेमध्ये राहण्याची सोय केली. तसेच त्याच्या जेवण्याखाण्याची देखील सोय केली. इचलकरंजीमधील माणुसकी फौंडेशनला याबाबतची माहिती दिली गेली. आज (शुक्रवार) या व्यक्तीला फौंडेशनचे ऋषिकेश चव्हाण यांनी उपचारासाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सामाजिक बांधिलकी दाखवत या तरुणांनी केलेल्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.