टोप ( प्रतिनीधी ) राज्यात गेल्या काही दिवसांपासुन मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात लाखो समाज बांधव सहभागी झाले आहेत. त्यात राज्य सरकारकडून मराठा समाजाला सरसकट दहा टक्के आरक्षण जाहीर देखील करण्यात आले. मात्र मराठा समाजाला हे आरक्षण मान्य नसून मराठा आंदोलकांनी ओबीसी कोट्यातुनच आरक्षणाची मागणी करत आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.

यातच सरकारची कोंडी करण्यासाठी मराठा समाजाकडून गावा गावांतून आगामी लोकसभेसाठी उमेदवार उभे करून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय आज हातकणंगले येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असून, मनोज जरांगे पाटील यांचे समाजाच्या हितासाठी चालू असलेले आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न राज्य सरकारकडून चालू आहे.

मात्र आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मराठा समाज हा प्रत्येक गावांतुन उमेदवार देईल यासाठी गावो गावी बैठका घेऊन प्रत्येक गावांतुन लोकसभेसाठी उमेदवार उभे करून, लोकवर्गीनीतून त्यांचा निवडणूक प्रक्रियेचा खर्च करण्याचे ही हातकणंगले येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ठरविल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात बैठकीचे नियोजन करण्यात आले, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील पन्हाळा, शिरोळ, शाहुवाडी, शिराळा, वाळवा, या तालुक्यांमध्ये बैठकांचे नियोजन करून प्रत्येक गावांतुन उमेदवार उभे करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती ही मराठा समाज्याच्या वतीने देण्यात आली. बैठकीस हणमंत पाटील, नंदकुमार नाईक, सुभाष चव्हाण, नितीन इंगवले, विनायक पवार, सुरेश इंगवले , अमोल चव्हाण , उत्तम नलवडे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची दिशा ठरणार

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून हणमंत पाटील यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करून याची सुरवात होणार आहे, पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. मुख्य आंदोलक जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच इथून पुढची दिशा ठरणार असून इच्छुकांनी तयारी देखील चालू केली आहे.