टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा तसेच करणी, भानामतीचे प्रकार वाढले आहेत. अमावास्येच्या रात्री अघोरी पूजा करण्याच्या प्रयत्नात असणारे भोंदूबाबा नागरीकांची चाहूल लागताच पसार झाले. आणि वारंवार घडणार्‍या या घटनांचा प्रतिबंध कसा करायचा, असा प्रश्न कासारवाडीतील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.

अंबपवाडीची स्मशानभूमी ही गावाबाहेर असून येथे वारंवार अंधश्रद्धा पसरवणार्‍या घटना घडत आहेत. येथे अघोरी पूजा, भूतबाधा काढणे, करणी, भानामती अशा पूजाकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग करणार्‍या कांही भोंदूबाबा करीत आहेत. कांहीवेळा चितेतील राखेचा वापर तंत्रमंत्र करण्यासाठी होत असल्याने गावकर्‍यांच्या भावनेशी खेळ सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी एका बालकाच्या चितेमधील राखेत अघोरी कृत्य केल्याचे रक्षा विसर्जनाच्या दिवशी निदर्शनास आले होते.

तर काल (गुरुवार) अमावास्येच्या रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत काहींजणांना संशयास्पदरीत्या वावरताना तरुणांनी पाहिले. याची माहिती त्यांनी सरपंच अच्युत खोत यांना दिली. यावेळी स्मशानभूमीत नागरिक जमताच हा भोंदूबाबा पुजा अर्धवट सोडून पसार झाला. यामध्ये कणकेच्या केलेल्या सुमारे २२ बाहुल्या, तसेच त्यामध्ये खोवलेले बिबे ,खिळे, लिंबू, त्यांची हळदीकुंकू आणि इतर साहित्य कागदात गुंडाळलेल्या स्थितीत होते. याची माहिती पोलिसांना ग्रामस्थांनी दिली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून त्या भोंदूबाबाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.