कोल्हापूर (प्रतिनिधी) : निराधार योजनेची पेन्शन मिळवून देण्याच्या बहाणा करून वृद्ध महिलेची दागिने काढून फसवणूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४३, रा. यादवनगर जयसिंगपूर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नांव आहे. त्याच्याकडून मोटारसायकलसह दागिने असा १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, सावर्डे (ता. हातकणंगले) येथून २८ सप्टेंबर २०२१ रोजी वृद्ध महिलेला निराधार योजनेची पेन्शन मिळवून देतो, असे सांगून संशयित कांबळे यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. तसेच महिलेला मोटारसायकलवरून कराड शहरात नेऊन तिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन तिथेच तिला सोडून तो पसार झाला. त्यामुळे याप्रकरणी वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर तपास सुरू असताना सदर गुन्ह्यातील संशयित कांबळे हा दागिने विक्रीसाठी उचगाव (ता. करवीर) येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कांबळे याला ताब्यात घेतले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, आशिफ कलायगार, विनोद कांबळे, रणजित पाटील, अनिल जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे अमर वासुदेव यांनी केली.