कुरुंदवाड (प्रतिनिधी) : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी मुख्य संशयित आरोपी महावीर मगदूम याच्यासह संचालक अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून मुख्य संशयित आरोपी मगदूम याच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून विवेक खुरपे याला पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे फरार आरोपी लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांनी संस्थेच्या जबाबदार कर्मचाऱ्यांसह संचालकांच्या मालमत्तांची माहीती संकलित केली आहे. त्यामुळे अपहाराची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष आगरे यांनी न स्विकारल्यास सहकारातील नव्या नियमानुसार संस्थेतील अपहाराची जबाबदारी संचालकावर निश्चित करुन त्यांच्या मालमत्तेवरच टाच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपहाराच्या रकमेची जबाबदारी घेण्यासाठी संचालकांनी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव आगरे यांच्यावर दबाव आणत आहेत.

राजीव पतसंस्थेत २०१६ ते २०२२ अखेर ४.५८ कोटीचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लेखापरिक्षक संभाजी शिंदे यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव आगरे, सेक्रेटरी श्रीकांत हिंगणगावे, कॅशीयर महावीर मगदूम, सोनार जयवंत महामुनी यांच्यासह सर्व संचालक असे एकूण बारा जणांविरोधात लेखापरीक्षक शिंदे यांनी कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी अध्यक्षपुत्र आणि संस्थेचे संचालक शैलेंद्र आगरे, सचिव श्रीकांत हिंगणगावे व सोनार जयवंत महामुनी यांना अटक करुन महिना झाले तरी मुख्य संशयित आरोपी मगदूम याच्यासह सर्वच संचालक फरारी असल्याने अटकेतील आरोपीं कोठडीतच आहेत. मगदूम याला शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. वारंवार ठीकाण आणि मोबाईल बदलत असल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत आहेत.

मगदूम हा विवेक खुरपे याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना समजल्याने पोलिसांनी शुक्रवारी खुरपे याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यामुळे मगदूमला पोलिस लवकरच गजाआड करण्याची शक्यता आहे.