कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रूर नियतीने संसार मोडला होता, तो केडीसीसी बँकेने सावरला; अशी कृतज्ञतापूर्वक भावना चंदगडच्या मंगल सुरेश कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. बँकेच्या सेवेत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर बँकेने मुलाला सेवेत घेतले. त्याच्याही अपघाती मृत्यूनंतर मुलीला सेवेत घेतले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत पल्लवी सुरेश कांबळे हिला नोकरीचे नियुक्तीपत्र दिले.

चंदगड येथील जुन्या बसस्थानक परिसरात नवीन वसाहतीत हे कुटुंब राहते. कुटुंबप्रमुख असलेल्या सुरेश दुर्गाप्पा कांबळे यांचे २०१६ साली सेवेत असतानाच निधन झाले. कानूर शाखेमध्ये दुपारच्या सुट्टीत जेवत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर वारसदार म्हणून त्यांचा मुलगा दीनानाथ सुरेश कांबळे याला बँकेने अनुकंपा धोरणांतर्गत सेवेत घेतले. अविवाहित असलेल्या दीनानाथचाही दीड वर्षांपूर्वी १४ मार्च २०२१ रोजी काजिर्णे धरणात बुडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.

या दोन्ही अपघाती घटनांनी मंगल सुरेश कांबळे, मोठी मुलगी रोहिणी व लहान मुलगी पल्लवी यांच्यावर जणू आकाशच कोसळले. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही या दोघीही बहिणींनी एम. एससी.चे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. बँकेने लहान मुलगी पल्लवी सुरेश कांबळे हिला सेवेत घेतले आणि या संकटग्रस्त कुटुंबाला आधार दिला.

यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. निवेदिता माने,  ए. वाय. पाटील, प्रताप ऊर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर आदी संचालक व  व्यवस्थापक जी. एम. शिंदे  उपस्थित होते.