कराची : पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकांना भाकरीसाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. पाकिस्तानात अनेकांना एकवेळच्या जेवणाची सोय करणे देखील कठीण झाले आहे, तर दुसरीकडे नागरिक इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठीही हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

पाकिस्तान जे अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. पीठ, दूध, तांदळापासून ते चिकन, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेलपर्यंत सर्वच लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पाकिस्तानातील महागाईची स्थिती अशी आहे की, महागाईचा दर २४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरवाढीमुळे लोक अन्नधान्यावर अवलंबून आहेत.

अनेक प्रांतातील शहरांमध्ये लोकं एलपीजीशिवाय राहत आहेत आणि जिथे गॅसही उपलब्ध आहे, तिथे सिलिंडरचे भाव गगणाला भिडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीवर नजर टाकली तर देशात गव्हाच्या तुटवड्याने मोठे रूप धारण केले आहे.

इस्लामाबादमध्ये गव्हाचा दैनंदिन वापर प्रत्येकी २० किलोच्या ३०,००० पिशव्यांचा आहे, परंतु येथे कार्यरत असलेल्या ४० पिठाच्या गिरण्यांमधून २१,००० पिशव्यांचा पुरवठा केला जात आहे. आता पीठाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर रावळपिंडीच्या बाजारपेठेत पिठाची किंमत १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. १५ किलोची पिठाची पोती २,२५० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लाहोरमध्येही पिठाचा भाव १४५ रुपये किलोवर पोहोचला आहे.