नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापुर्वी सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती खेळपट्टीची. संपूर्ण विश्वचषकात खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली. एकीकडे नासिर हुसेनसारख्या दिग्गज कर्णधाराने भारतीय खेळपट्टीचे कौतुक केले असताना दुसरीकडे जगात खेळपट्टीबाबत वाद सुरू आहे. आता फायनलपूर्वीही सगळीकडे फक्त खेळपट्टीचीच चर्चा आहे.


संथ खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल का ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर एकूण 11 खेळपट्ट्या आहेत. संथ खेळपट्टीवर अंतिम सामना खेळवला जाईल, असे मानले जात आहे. म्हणजेच चेंडू पडल्यानंतर तो फलंदाजांच्या जवळ जाताना काहीशी गती मंदावते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्टेडियममधील वैकल्पिक सराव सत्रादरम्यान खेळपट्टीचे तपशीलवार निरीक्षण केल्याची माहिती ही समोर आली आहे.

काळ्या मातीची खेळपट्टी संथ आहे

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तीन प्रकारच्या खेळपट्ट्या आहेत. काळ्या मातीचा बनलेला, लाल मातीचा बनलेला आणि दोन्ही मातीच्या मिश्रणाने बनलेला. काळ्या मातीच्या खेळपट्ट्या सामान्यतः संथ असतात. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अशाच विकेटवर पाहुण्या संघाचा डाव 191 धावांत गुंडाळला गेला. भारताने सात गडी राखून शानदार विजय नोंदवला. असे कळते की अंतिम सामन्याची खेळपट्टी देखील अशीच असेल जिथे फिरकीपटूंना अधिक संधी मिळतील.