नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (आयबी) पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या बेछूट गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल लाल फाम कीमा जखमी झाले, त्यांनी सांगितले, त्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय कीमा मिझोराममधील आयझॉल येथील रहिवासी होती. त्यांनी सांगितले की, कीमाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जीएमसी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, “8-9 नोव्हेंबर 2023 च्या मध्यरात्री दरम्यान, पाकिस्तान रेंजर्सनी रामगढ भागात बेछूट गोळीबार केला, ज्याला बीएसएफच्या जवानांनी योग्य प्रत्युत्तर दिले.”