दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी शालांत परीक्षेला महाराष्ट्रातून साधारण १६, ५८, ६२४ विद्यार्थी बसले होते. आज दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मिळालेले गुण हे वास्तव की फुगवटा अशी चर्चा सुरू झाली. आज दहावीचा निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे इयत्ता नववीची वार्षिक परीक्षाही देता आली नव्हती. त्यानंतर इयत्ता दहावीचे वर्ष ऑनलाइन एज्युकेशन आणि सेल्फस्टडी असा अभ्यास करतच निघून गेले.

नोव्हेंबरमध्ये काही दिवस वर्गात बसण्याची संधी मिळाली परंतु म्हणावा तसा अभ्यास झाला नाही. याला अनेक कारणे आहेत, यासाठी सर्वस्वी विद्यार्थ्यांना जबाबदार धरता येणार नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीनिशी कमी केलेल्या अभ्यासक्रमासह परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला. परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या. त्यामुळे परीक्षा होणार या विश्वासाने सराव परीक्षा उजळणी आणि परीक्षेसाठीचा विशिष्ट तंत्राने अभ्यास सुरू केला. परंतु कोरोनाने पुन्हा मान वर काढली आणि शासनाला व शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन परीक्षा रद्द करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला.

यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक किंवा शिक्षण मंडळ यापैकी कुणालाच दोषी धरता येणार नाही. यानंतर इयत्ता दहावीच्या निकालाचे सूत्र तयार करण्यात आले ज्यामध्ये इयत्ता नववीचे ५०% गुण आणि इयत्ता १० वीतील संपूर्ण कामकाजाचे ५० % गुण असा फॉर्म्युला ठरला आणि याच सूत्रांनुसार आज दहावीचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीपेक्षा या निकालातील उत्तीर्णचे प्रमाण ५% वाढले. हा बदल सोडला तर हा निकाल गेल्या कित्येक वर्षांच्या दहावीचा निकालाशी खूपच सुसंगत वाटतो. यावर्षी सुद्धा ९०% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ८३,२६२ आहे. दहावी परीक्षेमध्ये १००% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९५७ आहे. इतर विद्यार्थ्यांचे गुण हे नववी आणि दहावी या वर्गांची सरासरी असल्यामुळे दरवर्षीप्रमाणेच आहेत. बोर्ड परीक्षा न झाल्यामुळे अपेक्षित असलेला गुणांचा फुगवटा या परीक्षेत दिसत नाही.

यावरून बोर्ड परीक्षा असो की शालेय परीक्षा, शिक्षण मंडळाच्या नियोजनानुसार केलेले गुणदान योग्यच आहे हे सिद्ध होते. विद्यार्थीसुद्धा इयत्ता दहावीमध्ये आल्यानंतर विशिष्ट पद्धतीने अभ्यासाला लागून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे कठोर परिश्रमही या कालावधीमध्ये अधोरेखित होतात. बोर्ड परीक्षा झाली नाही म्हणजे विद्यार्थ्यांचे योग्य गुणदान झाले नाही आणि पर्यायाने कोरोना कृपेमुळे गुण मिळाले असे म्हणणे विद्यार्थी शिक्षकांवर अन्याय होईल. दहावीत असलेला विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षक हे किती मेहनत घेतात हे जवळून बघितल्याशिवाय समजणार नाही म्हणूनच या निकालावर टीकाटिप्पणी न करता विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देताना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल.

यानिमित्ताने काही प्रश्नही निर्माण होतात. इयत्ता दहावीचा निकाल तयार करताना नववीचा विचार केला जाणार आहे हे विद्यार्थ्यांना आधी माहीत असते तर इयत्ता नववीचे गुण अधिक चांगले मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून नक्की झाला असता. किंबहुना इयत्ता नववीसाठी इयत्ता दहावी इतकेच महत्त्व प्राप्त झाले असते. दुसरी गोष्ट इयत्ता दहावीच्या वर्षभराच्या मूल्यमापनावरून गुण मिळणार आहेत हे आधी माहीत असते तर विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीतील प्रत्येक दिवस बोर्ड परीक्षेतील गुण मिळवण्यासाठी म्हणून व्यतीत केला असता आणि आज जे गुण मिळाले आहेत त्यामध्ये अजुन भर टाकता आली असती. यासाठी असे निर्णय घेताना शासनाने अगदी परीक्षेच्या तोंडावर किंवा निकाल तोंडावर असताना निर्णय न घेता तो पुरेसा कालावधी शिल्लक असताना शिक्षण व्यवस्थेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

यावर्षी सुद्धा इयत्ता १० वीचे वर्ग शाळा आणि क्लासेसमध्ये सुरू झालेले असतानाही अजून अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि वेगळे बदल याबद्दल कुणीच काही बोलत नाही. दहावीची सुरवात करताना असे बदल विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना माहीत असतील तर वर्ष भराची तयारी करणे अधिक सोपे होईल यात शंका नाही. आज विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. कोरोना कालावधीत शैक्षणिक क्षेत्राची हानी झालेली असतानाही त्यांनी घेतलेली उत्तुंग झेप आहे. त्याचा अपमान न करता आणि कोरोनाबॅच म्हणून न हिनवता या सर्व विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचे कौतुक करून भविष्यामध्ये असे प्रसंग पुन्हा आले तर काय? याचे उत्तर शिक्षण मंडळ आणि शासनाने तयार ठेवणे गरजेचे आहे.

पुनश्च: सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी कोरोना कालावधीतही शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाही ठेवल्याबद्दल अभिनंदन. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे कौतुक आणि उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

 प्रा. सर्जेराव राऊत

शैक्षणिक विभाग प्रमुख,

चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभाग