कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतींच्या खरेदी- विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरातील चारही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असताना नोंदणी कार्यालय, जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर १, करवीर २, करवीर ३ आणि करवीर ४ कार्यालयात अनागोंदी कारभार सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनामध्ये, भोगवटा नसलेले दस्त नोंदणीस प्रति दस्त रु.५,०००/- ते ३,०००/- रक्कम आकारली जाते. खोटा NA ऑर्डर नक्कल काढण्यासाठी प्रति दस्त रु.५,०००/- ते १०,०००/- रक्कम आकारली जाते. खरेदीपत्र किंवा इतर दस्त, नक्कल काढणेस सरकारी दर प्रती पान रु.५/- असताना रु.१० ते १५/- आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. इंडेक्स प्रत काढणेस खर्च रु.२५/- असताना रु.१००/- घेतले जातात. साधे खरेदीपत्र – रु.१,०००/- ते २,०००/-, साधे गहाणपत्र – रु.५०० ते १,०००/-, साधे रिकन्व्हेन्स – रु.५००/-, साधे हक्कसोड पत्र – रु.१,०००/- ते ३,०००/-, साधे वाटणीपत्र -रु.१,०००/- ते ३,०००/- अशी जास्तीची रक्कम आकारली जात आहे.
करवीर क्र.२ या ऑफिसला नोटरी असलेले वटमुखत्यारपत्र आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंट वर दस्त केला आहे. त्यात कदाचित रु.५०,०००/- ते १,००,०००/- इतका भ्रष्टाचार केला गेला आहे. तसेच प्रत्येक ऑफिस शिपाई, क्लर्क, ऑपरेटर आणि उमेदवार प्रत्येकाला (रु.१००/-, २००/- किंवा ५००/-) रक्कम दिल्यावरच काम केले जाते. जे दस्त प्रोपर येणे ऑर्डर किंवा प्रॉपर्टी कार्ड वर होणे आवश्यक आहे. असे काही दस्त तुकडाबंदीचे दस्त ७/१२ उताऱ्यावर होतात. डुप्लिकेट नकाशे लावून सुद्धा दस्त केले जातात. साधारणत: एक रजिस्टर दिवसाला ४० ते ५० दस्त करतात. प्रत्येक दस्त मागे रु.१,०००/- घेतले तरी दिवसाकाठी रु.४० ते ५० हजार वरकमाई केली जाते. नोंदणी व मुद्रांक विभाग, कोल्हापूर अंतर्गत तुकडेबंदी ले आऊटचे नियमाचे उल्लंघन करून अनेक प्रकरणांची नोंदणी करण्यात आली असल्याचे निदर्शनास येत आहे. गोरगरीब नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करून राजरोज भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे सर्व तक्रारींची चौकशी होवून या गैरकारभारास कारणीभूत असलेल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणेत यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, रणजीत मंडलिक, राहुल चव्हाण, गणेश रांगणेकर, राजू पाटील, बाळासाहेब शेलार, कपिल सरनाईक, सुरेश माने, श्रीकांत मंडलिक, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, अशोक माने, किरण पाटील आदी उपस्थित होते.