पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदार संघातील नागरिकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. तेथील तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा ते विचार करतात. काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

यावेळी प्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते कोथरुडमधील अभिनव स्कूल येथे या फिरते बाल बाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.

ना. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, बाल वय हे संस्कारक्षम असते. या बाल वयातच विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे ग्रंथ वाचण्यास मिळाले, तर त्याच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडतो. त्यामुळे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कोथरुड मतदारसंघात मोफत फिरते बाल वाचनालय सुरू करताना मला प्रचंड आनंद होत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

तसेच टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेम अशा विविध अत्याधुनिक साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी कमी होत असल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे, अवांतर विषयांच्या पुस्तक वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी विद्यार्थ्यांना हा उपक्रम नक्कीच लाभदायक ठरेल, असा मला विश्वास वाटत असल्याचेही ना. पाटील म्हणाले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.