पंढरपूर (प्रतिनिधी) : करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल आणि आरमी मदरसामध्ये 29 विद्यार्थ्यासह दोन शिक्षकांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाली. त्यांना करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने करकंब आणि परिसरातील शिक्षणक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल आणि आरमी मदरसामधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शिळे अन्न दिले गेले. या शिळ्या अन्नातून मौलाना आझाद येथील शिकणारे सात विद्यार्थी, मदरसातील विद्यार्थी तसेच दोन शिक्षकांना विषबाधा झाल्याने त्यांना उलट्या, जुलाब सुरू झाले होते. यांना करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 29 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना विषबाधा झाल्याने करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद केंद्रप्रमुख रविकिरण वेळापूरकर यांनी दिली आहे. 

यावेळी करकंब पोलीसांनी मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सादिक पटेल, आरमी मदरसाचे संस्थापक शौकत पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे करकंब तसेच परिसरातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शिक्षणाचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे.