कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी पुकारण्यात असली तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही. दररोज कोरोना रुग्णसंख्येत आणि मृत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू शकतो, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे त्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. ते आज (सोमवार) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संचारबंदीचा फायदा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होतं, लाट सौम्य येईल पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती, परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमधील लोक ही मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे.

दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. दिल्लीने कडक लॉकडाउन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाउन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करून राज्यात कशा प्रकारचा लॉकडाऊन लावता येईल, याची घोषण करण्यात येईल.