गगनबावडा (प्रतिनिधी) : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून राज्यातील सर्व शिधावाटप रास्तभाव धान्य दुकानदारांच्या प्रलंबित न्यायहक्क मागण्यांची पूर्तता करावी. तसेच धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणीची सोडवणूक करावी, असे निवेदन गगनबावडा तहसीलदार गोरे यांना रास्तभाव दुकानदारंनी दिले.

यावेळी गगनबावडा तहसीलदार कार्यालयासमोर रेशन दुकानदारांकडून दिवसभर उपोषण करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या, अडीअडचणी तसेच समस्यांची सोडवणूक करावी. मात्र, शासनस्तरावरून कोणतीही कारवाई झाली नाही. १० जानेवारीला अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक जाहीर करण्यात आली होती.

या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये ५० रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. लवकरच या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यात येईल अशी सुतोवाच मंत्र्यांनी या बैठकीवेळी केले होते. परंतु, आजपर्यंत या विषयावर कोणताही निर्णय झाला नसून या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक झाली नाही.

तरी लवकरात लवकर ही बैठक पूर्ण होऊन धान्य दुकानदारांना न्याय मिळावा, अशा आशयाचे निवेदन गगनबावडा तहसीलदार गोरे यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील धान्य रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील, कमिटी सदस्य, सर्व दुकानदार उपस्थित होते.