नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याची गरज असल्याचे सांगितल्याने केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन लस उत्पादन वाढविण्याचा आदेश दिला आहे. या परिस्थितीत आणखी एक दिलासादायक वृत्त आहे. रशियाने तयार केलेली स्पुटनिक व्ही या लसीचा पहिला लॉट आज दुपारी हैदराबाद विमानतळावर पोहोचला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या देशात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. देशात काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने कोरोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे.