मुंबई : सध्या जितके व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत, तितके याआधी महाराष्ट्रात होत नव्हते. यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदातिच हीच अवस्था एकनाथ खडसेंची झाली असावी. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी भाजपात परतण्याचा निर्णय घेतला असा दावा खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजपाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. पक्षात होणारा अन्याय तसंच इतर कारणांचा दाखला देत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपा सोडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. पण आता एकनाथ खडसे पुन्हा त्याच भाजपा पक्षात परतणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचे याआधीच सांगितले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपात प्रवेश करावा ही इच्छा बोलून दाखवली होती.येत्या 15 दिवसाच्या आत दिल्ली येथे राष्ट्रीय नेतृत्वाच्या हातून माझा भाजपात प्रवेश होणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.