कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या सणात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये रखूबाई निनो कंक (वय 70) आणि निनो यशवंत कंक (वय 75) या दांपत्याचा समावेश आहे. हे दोघे शाहूवाडी तालुक्यातील गोलीवणे गावचे रहिवासी असून, परळीनिनाई येथील बॅकवॉटर परिसरात शेळीपालनासाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळी पालनासाठी वृद्ध दाम्पत्य गेले होते. यावेळी बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सकाळी गावकऱ्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभाग आणि पोलिसांना कळवले. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या वाढत्या हालचालींबाबत वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.