कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ शिरगाव येथे गोकुळ दूध संघाच्या आवारातील कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अभिवादन केले. तसेच सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी कै. चुयेकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निश्चय सर्व उमेदवारांनी केला.

गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज झाली. यानंतर, सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे जाऊन कै. चुयेकर यांना अभिवादन केले. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांनी, आनंदराव पाटील चुयेकर यांनी मोठ्या कष्टातून गोकुळची स्थापना केली. सर्वसामान्य दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी संघाचा कारभार केला. त्यांच्या या कामाचा आदर्श घेऊन आम्ही यापुढे ही कार्यरत राहू, असे प्रतिपादन केले. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे,आ. राजेश पाटील यांनी कै. चुयेकर यांच्या कामाचा गौरव केला.

यावेळी, नाविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील (चुयेकर), बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील,  रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, अजित नरके, करणसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, सुश्मिता पाटील, श्रीमती अंजना रेडेकर, अमर पाटील, बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.