कागल (प्रतिनिधी) : सहकारातील आदर्श असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास हंगाम २०२१-२२ करिता व्हीएसआय पुणे यांनी कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता तथा मोस्ट  इनोव्हेटिव्ह फॅक्टरी अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या पुरस्कारामुळे कारखान्याच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कारांची एकूण संख्या ६७ झाली असून, या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचे व्यवस्थापन व प्रशासन कार्यरत आहे.

हा पुरस्कार देताना कारखान्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर, उत्कृष्ट ऊस विकास योजना आणि त्याची अंमलबजावणी, ठिबक सिंचन योजना, आधुनिकीकरणाचा वापर, आदी बाबीचा साकल्याने विचार करून शाहू कारखान्यास हा पुरस्कार जाहीर केला आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून, पुरस्काराचे वितरण २१ जानेवारी रोजी पुण्यातील व्हीएसआय संस्थेत होणार आहे.