कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत गावोगावी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक व सामूहिक योजनाच्या साहित्याची वेगवेगळ्या यंत्रणेमार्फ़त तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी जाहीर केले आहे. समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी हे साहित्य खरेदी करुन ते कशाप्रकारे वापरले आहे किंवा नाही. तसेच सामूहिक योजने अंतर्गत हे काम समाजकल्याण विभागाने नेमून दिलेल्या वस्तीतच झाले आहे का, तसेच त्याचा दर्जा कसा आहे, याबाबत तापसणी केली जाईल. या कामामध्ये दोषी आढळ्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा सीईओ चव्हाण यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थी/विद्यार्थिनींना सायकलकरिता १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी करावी व सायकल कंपनीशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना मजबूत व टिकाऊ सायकलच्या दराबाबत निश्चिती करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिव्यांग शाळेच्या कार्यशाळेमध्ये कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, गौरी मुखवटे, बैल याबरोबर इतर खेळणी बणविण्यासाठी लागणारे यंत्र तसेच शिलाई मशीन, लॅमिनेशन मशीन, ट्रम्पोलीन स्पायरल बाईडिंग मशीन, मेणबत्ती बणविण्याचे मशीन, पक्षांची घरटी बनविण्यासाठी लागणारे साहित्य २०२२-२३ मधील तरतुदीमधून पुरविण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.