कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील प्रसिद्ध असणाऱ्या कैलासगडची स्वारी मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. आ. चंद्रकांत जाधव हे मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती. या निवडीच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव होते.

कैलासगडची स्वारी मंदिराच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात आ. चंद्रकांत जाधव यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे आ. जाधव यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची निवड करावी, असा ठराव सर्व विश्वस्तांनी एकमुखी मंजूर केला. त्यामुळे मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी सत्यजित जाधव यांची निवड करण्यात आली असल्याचे बबेराव जाधव यांनी सांगितले. तसेच सत्यजित जाधव आणि दश्मिता जाधव यांचा अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, सचिव अशोक मिस्त्री, सहसचिव विलास गौड, उदय कारंजकर, धनाजीराव जाधव, केशवराव पोवार, अजितराव जाधव, शिवाजी जाधव, किशोर भोसले, मंदिराचे पुजारी विठ्ठल जाधव, गणेश भोसले आदी उपस्थित होते.