कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूधगंगा डावा कालव्याच्या बांधकामासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याची  फरकासह रक्कम २ कोटी ३ लाख रुपये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.  याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल येवती (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र  आम आदमी पार्टीचे  अध्यक्ष  संदीप देसाई  यांचा सत्कार केला.

येवती (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांना प्रशासनाने दूधगंगा डावा कालवा (४४-४५ की. मी.) बांधकामासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला १.२  फॅक्टरने दिला होता. परंतु, नवीन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला २ फॅक्टरने  देणे गरजेचे होते.  ही बाब ग्रामस्थांनी ‘आप’च्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच प्रशासनाने नवीन २ फॅक्टरनुसारचा फरक ग्रामस्थांना त्वरित न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर याची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने फरकाची रक्कम २ कोटी ३ लाख रुपये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली.

त्यानंतर येवती येथील संदीप पाटील, तानाजी पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने आपच्या कार्यलयास भेट देऊन  संदीप देसाई यांचे आभार मानले. तसेच विशेष म्हणजे इथून पुढच्या आपच्या वाटचालीमध्ये सक्रिय सहभागाची खात्री देत ५००१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.