मुंबई : मराठी सिनेसृष्टीमधील 1988 साली प्रदर्शित झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा असा चित्रपट आहे जो कोणी पाहिला नसेल असं कोणीच नाही. आज 37 वर्षांनीही ‘अशी ही बनवाबनवी’ बद्दल तितकीच चर्चा होते. अजूनही लोक हा चित्रपट पाहायला कंटाळत नाहीत. नुकतीच अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ची एक आठवण सोशल मीडियात शेअर केली आहे.

1988 पासून ऐकतोय 70 रुपये वारले पण आज 70 रुपयाची नोट पाहतोय! कुणी मला विचारेल, कशी ही बनवाबनवी? तर मी म्हणेन अशी ही बनवाबनवी. अशी पोस्ट सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियात शेअर केली आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील डायलॉग एकापेक्षा एक असे ठरले. ‘तुम्ही दिलेले 70 रुपये वारले ओ, ‘हा माझा बायको’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, असे एक ना अनेक डायलॉग आणि प्रसंगावर अजूनही चर्चा केली जाते. अवघ्या अडीच तासाच्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे पैसा वसूल मनोरंजन केले. या सिनेमातील गाणी खूप सुंदर आहे. अशोक सराफ, सोबत लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सोबत सुधीर जोशी यांनी हा सिनेमा अजरामर केला.

सचिन पळगावकर यांनी एका मुलाखतीत ’70 रुपयेही वारले’ या डायलॉगमागचा किस्सा सांगितला होता. सिनेमाचे लेखक वसंत सबनीस यांना डायबिटीस होता. सबनिस यांनी त्यांच्या एका जवळच्या मित्राला इस्त्रायलमधून डायबिटीसचं औषध आणायला 70 रुपये दिले होतेय त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातला हा किस्सा सिनेमातही टाकला आणि आज तो अजरामर झालाय, असे सचिन पिळगावकर म्हणाले होते.