कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील आर. के. नगर रोडवर आज (मंगळवार) दुपारी धावत्या कारला अचानक आग लागल्यामुळे या कारचे सुमारे पाऊण लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कबनूर येथील प्रवीण मांगलेकर हे काही कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. दुपारी त्यांनी त्यांचा चालक प्रेम कदम याला कारमध्ये पेट्रोल भरून आणण्यास सांगितले. त्यानंतर चालक यांची कार घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आर. के. नगरकडे चालला होता. तो रोडवरून जात असताना अचानक या कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच चालक प्रेम कदम यांनी प्रसंगावधान राखत, ही कार रस्त्याच्या कडेला घेतली. त्यानंतर इंजिन मधून धूर येऊन अचानक कार ने पेट घेतला. यात कारचे सुमारे पाऊण लाखांचे नुकसान झाले.
चालक कदम याने याबाबतची माहिती अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर या ठिकाणी काही वेळातच आलेल्या अग्निशमक दलाच्या दस्तगीर मुल्ला, सुभाष मगदूम अभय कोळी आणि अशोक साठे यांनी या कारला लागलेली आग आटोक्यात आणली.