अहमदनगर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका केली होती. त्यानंतर अण्णा हजारेंनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला. आता यावर रोहित पवार यांनी अण्णा हजारेंना खोचक टोला लगावला आहे.

2014 पूर्वी काँग्रेस सरकार सत्तेत असताना प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे आणि त्यावर प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी 2014 नंतर मात्र देशात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना आणि लोकशाही शेवटच्या घटका मोजत असतानाही शांतच राहिले नाही तर गायब झाले, असा टोला शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी लगावला आहे.

एका बाजूला ते स्वत: ला नवीन काळचा गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपाच्या कार्यकाळात सोयीचं आंदोलन करतात. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुखवटा घातला आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल, असं म्हणत रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. अण्णा हजारे यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांना 12 वर्षांनंतर जाग कशी आली? माझ्या आंदोलनांमुळे यांचे मंत्री घरी गेल्याचा त्यांना राग असावा, असं अण्णा हजारे म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी टीका केली आहे.