गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द हे १५ ते २० गावे, वड्या-वस्त्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. गावातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. भुदरगड पंचायत समिती सभापती या गावच्या असून त्यांच्या गावातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

गावाची सुमारे ३ हजार लोकसंख्या असून राजकीय, शैक्षणिक दृष्टया जागरूक,  संवेदनशील गाव आहे. या खोऱ्यातील अनेक वाडीवस्ती व छोटया मोठ्या गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मिणचे खुर्द गावात अनेक विकासकामे, सोयी उपलब्ध होत आहेत. तसेच गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले आहेत.

परंतु, मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे “खड्डेच खड्डे चोहीकडे गेला रस्ता  कोणीकडे” अशी अवस्था झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनधारकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर अपघाताची शक्यता वाढली आहे.

या रस्त्यावर पंचायत समिती सभापतींचे घर आहे. त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याची अशी अवस्था आहे. त्या या रस्त्याकडे लक्ष देणार कधी ? अशी विचारणा भागातील नागरिक करत आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  सामाजिक कार्यकर्ते तुकाराम देसाई यांनी दिला आहे.