कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी ७६ कोटी रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर २२ ऑक्टोबर रोजी जमा करणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी दिली.
ते म्हणाले की, यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ४५ कोटी ८३ लाख ४४ हजार तर गाय दुधाकरिता १७ कोटी ४६ लाख ५६ हजार इतका दूध दरफरक व त्यावरील ६% प्रमाणे होणारे व्याज १ कोटी ८९ लाख ९० हजार व डिबेंचर्स व्याज ७.७५% प्रमाणे ५ कोटी ५६ लाख ४५ हजार असे एकूण रुपये ७० कोटी ७६ लाख ३६ हजार इतकी रक्कम दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाईल.
तसेच शासनाने सहकारी संस्था अधिनियमात दुरुस्ती करून सर्वसाधारण सभेमधील महत्वाच्या विषयांना मंजूरी देण्याचे अधिकार संचालक मंडळाला दिले असल्याने संस्थेचा डिव्हिडंड ५ कोटी ३ लाख २५ हजार या महिन्यात असणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेऊन तोही दिवाळीपूर्वी दूध संस्थाच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. लाभांशाची रक्कम रुपये ५ कोटी ३ लाख २५ हजार व म्हैस व गाय दूध दर फरक रक्कम रुपये ७० कोटी ७६ लाख ३६ हजार अशी एकूण अंदाजे रुपये ७६ कोटी इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी वर्ग करणेत येणार आहे.