कोल्हापूर (प्रतिनिधी) : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. कोरोनानंतर प्रथमच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. घरोघरी गृहिणींची लगबग सुरु आहे. विविध प्रकारचे कपडे, फराळाचे पदार्थ, वस्तूंनी बाजारपेठ सजल्या आहेत; मात्र सध्या रोजच केव्हाही कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.

महाद्वार रोड, राजारामापुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड या परिसरात रांगोळी, पणत्या, रोषणाई व फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे गांधीनगरची बाजारपेठही फुलली आहे. खरेदीच्या मूडमधील नागरिकांमुळे शहरातील अनेक चौकांमध्ये, रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत असला तरी उघडीप पाहून शहरासह परिसरातील सहकुटंब नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने बाजारपेठेतील रस्ते हळूहळू गर्दीने फुलून जात आहेत. दिवाळी पाडव्यापर्यंत खरेदीचा हा आनंद द्विगुणीत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात फराळ, कपडे, पणत्या, रांगोळी, आकाश कंदील आदी साहित्य खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. विक्रेतेही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहेत. विविध आकाराच्या आणि डिझाईनच्या चिनी मातीसह तयार पणत्यांना मागणी आहे. कागदी आणि प्लास्टिकचे आकर्षक आकाश कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध रंगाच्या रांगोळीलाही मागणी आहे. लक्ष्मी पूजन आणि दिवाळीनिमित्त सजावटीचे साहित्यही बाजारात आले असून, त्या स्टॉलवरही ग्राहकांकडून खरेदी सुरु आहे.

दिवाळीसाठी कापड उद्योगात मोठी उलाढाल असते. सध्या तयार कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत तयार कपडे उपलब्ध झाल्याने अशा दुकानात गर्दी पहायला मिळत आहे. वेगवेगळ्या आकारात आणि रंगात पणत्या विक्रीसाठी रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते बसलेले आहेत. मोबाईल, टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुमसमोर खास मंडप उभारण्याचे काम सुरु असले तरी त्यात रोजच्या पावसाचा व्यत्ययही येत आहे.

दिवाळीनिमित्त विविध वस्तूंच्या दुकाने व बझारासह दुचाकी, चारचाकी वाहनांच्या कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. रोज सायंकाळी पडणाऱ्‍या पावसाने निरुत्साहाचे वातावरण होत असून, काही बाहेरगावचे नागरिक अशा पावसातच खरेदी करुन परतत आहेत. या पावसाचा फटका रस्त्यावरील विविध विक्रेत्यांना बसला आहे. दिवाळी सुट्टीत चिमुकली मंडळी किल्ले उभारण्यात मग्न असली तरी पावसाने त्यांच्या या कामात व्यत्यय येत आहे. किल्ल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, मावळ्यांचे पुतळे बाजारात दाखल झाली आहेत. शिवराय व मावळ्यांचे छोटे-छोटे पुतळे खरेदी सुरु आहे.

दिवाळी आणि मिठाई हे समीकरण हे ठरलेलेच आहे. ऑनलाईन खरेदीपेक्षा यावेळी ग्राहकांनी प्रत्यक्ष खरेदीवर पसंती दाखवली आहे. त्यामुळे बाजारपेठ सर्वत्र फुलेली दिसून येत आहे. बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील, दिवे, रंगीबेरंगी विद्युत मळा, रांगोळी, फराळ, मिठाई तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत. घरोघरी दिवाळीच्या फराळासाठी विविध पदार्थ तयार करण्यात महिला वर्ग व्यस्त झाल्या आहेत. घरी बनवल्या जाणाऱ्या फराळासाठी लागणारे मसाले तसेच काजू, बदाम, पिस्त, मनुका, अक्रोड या सुक्या मेवासह अनेक प्रकारच्या मिठाईची बाजारपेठेत विक्री वाढली आहे. दागिने, कपडे, गिफ्ट खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठ फुलली आहे.