मुंबई : पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव. वर्षभर वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी आस लावून बसलेले असतात. २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान, विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार आहेत. अशातच राहुल गांधी देखील वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंढरीची वारी म्हणजे एकप्रकारे उत्सव आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव. महाराष्ट्रातील या वारीने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांना अचंबित केलं आणि या वारीत सामील होण्यास भाग पाडलं. अशा या वारीत सामील होण्यापासून राहुल गांधीही स्वत: रोखू शकणार नसल्याचं दिसतंय. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत.

पायी वारी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोहळ्यात राहुल गांधी वारकरी भक्तांसोबत पायी चालणार आहेत. शरद पवार यांच्या ‘वारी अनुभवा’ ह्या घोषित कार्यक्रमानंतर राहुल गांधी देखीदेखील पंढरीच्या वारीत सहभागी होणार आहेत. वारकरी भक्तांसोबत पायी सोहळ्यानंतर पंढरपुरात येऊन राहुल गांधी विठ्ठलाचं दर्शनही घेतील. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठीकडून पंढरपूर येथील शिरस्थ पदाधिकारी यांच्याकडे वारी बाबत माहिती घेतली जात आहे.

राहुल गांधी वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रयत्न
राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण आहे. शेतकऱ्यांनी महागाई, केंद्र आणि राज्य सरकारांची धोऱणे आणि सध्याची राजकीय परिस्थिती यामुळे लोकसभेला महायुतीला दणका दिला होता. हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी काँग्रेस राहुल गांधी यांना वारीत आणण्याचा विचार करत आहे.

पुण्यात दोन दिवस वारीचा मुक्काम असणार आहे. नंतर पुढे ती सासवड, लोणंद, फलटणमार्गे पंढरपूरला जाणार आहे. या वारीत राहुल गांधी देखील चालताना दिसणार आहेत, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. भारत जोडो यात्रा व न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी पायपीट केली होती. यामुळे वारीतही राहुल गांधी यांना आणल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.