कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘होते असे कधी कधी’ या एकांकिकेने सांघिक तृतीय क्रमांक मिळवला. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाविद्यालयाची निवड झाली असून, या एकांकिकेचे लेखक विद्यार्थी संग्राम देसाई यांना ‘उत्कृष्ट लेखक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रीय कलोपासक पुणे, गायन समाज देवल क्लब आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाच्या भाषा भवन येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवणारे डी. वय. पाटील अभियांत्रिकी हे कोल्हापुरातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

स्पर्धेत सहभागी कलाकारांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष-आमदार सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल पाटील यांचे  सहकार्य लाभले. या एकांकिकेचे दिग्दर्शन विद्यार्थी प्रसाद वनारे याने केले. प्रथमेश भोसले, आफान मोमीन, राजेश पाटील, समर्थ तपकीरे इत्यादी कलाकारांनीही यासाठी अथक परिश्रम घेतले.