कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील तीन वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आज (गुरुवार) जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यशवंत बापू नलवडे (वय ५१, रा. सावे, ता.शाहुवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.

सावे येथे यशवंत नलवडे हा आपल्या कुटुंबियांसह राहतो. त्याच्या घरात लहान मुले असल्याने ही अल्पवयीन मुलगी खेळण्यासाठी त्याच्या घरात जात होती. २८ ऑक्टोबर २०२० रोजी ही अल्पवयीन मुलगी आरोपी नलावडेच्या घरी गेली असता तो एकटा घरी होता. याचा फायदा घेवून त्याने तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल होऊन पोलीसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने यशवंत नलवडे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर याचा तपास पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी केला.