मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याचे राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. या सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ९ जानेवारी २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे केली होती.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड सुरु आहे. यासाठी विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणतेही शासनाचे केंद्र उपलब्ध नाही. यामुळे अपेक्षित असणारी विकास प्रक्रिया गतिमान करताना अडथळे निर्माण होत आहेत. नियोजन विभागाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी कोल्हापूरातील राजाराम तलाव येथील जागा प्रस्तावित केली आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अर्थसंकल्पात कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधीची तरतूद होण्याची मागणी केली होती. यावेळी आगामी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

त्यामुळे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून, कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास आजच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापुरात होणारे कन्व्हेन्शन सेंटर हे जिल्ह्याच्या विकासात मानबिंदू ठरेल. तसेच लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कामाला सुरवात होणार असल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली.