नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली असून, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातही ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. बहुतांश ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूर आदी ठिकाणी मुस्लिम समाजाने मोर्चा काढून नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली आहे. एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम असताना औरंगाबाद, सोलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले, तर अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. प्रेषित पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. सोलापूरसह अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. शिवाय बंदही पाळण्यात आला. देशभरातल्या मुस्लिम संघटनांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवला. सोलापुरात एमआयएमने भव्य मोर्चा काढला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली असून नुपूर शर्मांना अटक करा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.