कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या बांबवडे शाखा कार्यालयाने बांबवडे गावातील २०० केव्हीए क्षमतेचे नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलून वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला. बुधवारी (दि.१७) सायंकाळी साडेपाच वाजता बांबवडे – पिशवी रोडवरील २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त झाले. त्यामुळे  बांबवडे गावातील घरगुती ५००, वाणिज्यिक २४७, औद्योगिक १२ अशा एकूण ७६१ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला. शेजारील रोहित्रावरून तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून सिंगल फेज ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यात आला. 

बांबवडे हे मुख्य बाजारपेठेचे गाव व गुरुवारी आठवडा बाजाराचा दिवस असल्याने थ्री फेज ग्राहकांचा वीज पुरवठाही सुरळीत होणे आवश्यक होते. शाहूवाडीचे उपविभागीय अभियंता अभय शामराज यांनी ही बाब कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांना कळविली.  परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता पाटील यांनी  खटाटोप करून रात्रीतूनच इचलकरंजी येथून रोहित्राची उपलब्धता केली. गुरूवारी सकाळी रोहित्र बांबवडे येथे आणून बसविण्यात आले.

सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याने व्यापारी संघटनेने महावितरणचे कौतुक केले. बांबबडे शाखेचे सहाय्यक अभियंता राजेश माने यांच्यासह प्रधान तंत्रज्ञ  चौगुले, जनमित्र अक्षय पाटील, विकास सावंत यांनी ही कामगिरी पार पाडली.