प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ तपोवनवर सभा

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) – कोल्हापुरात शनिवारी दि. २७ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणारी ही सभा अतिविराट होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला दोन लाखावर गर्दी होईल, असेही ते म्हणाले.

या सभेच्या नियोजनासाठी कोल्हापुरात हॉटेल पॅवेलियनमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस -अजित पवार गट, शिवसेना- एकनाथ शिंदे गट आणि मित्र पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसनशील भारत ही ओळख पुसून विकसित भारत हा नवा लौकिक निर्माण केला आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे आणि भारतवासीयांना कल्याणकारी योजना देण्याचे मोठे कार्य केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने या दोन्हीही जागा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविकात खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात होत असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ऐतिहासिक होईल. महायुतीतील सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी ही अतिविराट सभा यशस्वी करायचा निर्धार केला आहे. त्यासाठी महायुतीमधील सर्वच घटकांनी समन्वयाने नियोजन करून प्रत्येक तालुकानिहाय या सभेचे नियोजन केले जाईल.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने, समरजीत घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर व धैर्यशील देसाई, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणराव डोंगळे, सम्राट महाडिक, भूषण पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजपचे महानगर विजय जाधव, शिवसेना शहराध्यक्ष सुजित चव्हाण, विजय जाधव, पी. जी. शिंदे, अशोकराव चराटी, डॉ. संजय पाटील, बाबासाहेब पाटील, एम. पी. पाटील, संतोष धुमाळ, सोमनाथ घोडेराव आदी प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.