कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट दिली आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येणार आहे. दरम्यान, थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग न होता चालू वीजबिलांचा भरणा  न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ७८ हजार ८०८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ७२ कोटी ६१ लाख व चालू वीजबिलांच्या ४० कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण ८९ कोटी ६ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ५५ हजार १४३ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ७५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ५८ कोटी ६१ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

गेल्या मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरवात केली. या धोरणातील योजनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ४५ हजार ४६२ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे ४११ कोटी १५ लाख सुधारित थकबाकी आहे. यातील ५० टक्के थकबाकी तसेच चालू वीजबिलांचे १०२ कोटी ९२ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम देखील माफ होणार आहे.