कुरुंदवाड (कुलदीप कुंभार) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली असून, यामध्ये दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ ‘खुला महिला’ गटासाठी आरक्षित झाला आहे. या आरक्षणामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तर महायुतीकडून या जागेसाठी छत्रपती ग्रुपच्या पूजा अविनाश पाटील यांचे नाव आघाडीवर आले आहे. मतदारसंघातील मागील दोन निवडणुकांचा इतिहास, सहानुभूती आणि संकटकाळात केलेली मदतीची कामे पाहता, पूजा पाटील यांना जनतेचे निर्णायक नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, प्रमोद दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्याचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा भाग म्हणजे महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात केलेली भरीव मदत. महापूर काळात पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यापासून ते त्यांना अन्न, निवारा आणि जीवनावश्यक वस्तू पुरवण्यापर्यंत प्रमोद दादा पाटील व त्यांच्या टीमने सातत्याने काम केले. कोरोना (कोविड-१९) महामारीच्या अत्यंत कठीण काळात आरोग्य सुविधा, अन्नधान्य वाटप आणि जनजागृतीसाठी छत्रपती ग्रुपने घेतलेला पुढाकार मतदारसंघातील जनतेच्या स्मरणात आहे. या संकटकाळात जीवाची पर्वा न करता केलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे, मतदारसंघातील युवा वर्ग मोठ्या संख्येने प्रमोद दादा पाटील यांच्यासोबत जोडला गेला आहे. तरुणाईचा हा पाठिंबा, आता त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार पूजा पाटील यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे.
पूजा अविनाश पाटील या प्रमोद दादा पाटील यांच्या भावजय आहेत. यापूर्वी त्यांचे पती अविनाश पाटील यांनी निवडणूक लढवून भरघोस मते घेतली होती. त्यानंतर प्रमोद दादा पाटील यांचा याच मतदारसंघातून निसटता पराभव झाला होता. मागील दोन निवडणुकांमध्ये छत्रपती ग्रुपला मिळालेला पाठिंबा आणि नंतर झालेला निसटता पराभव, यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारची सहानुभूतीची लाट तयार झाली आहे. यावेळी थेट त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळत असल्यामुळे, ही सहानुभूती निर्णायक ठरू शकते.
विकासकामे, समाजकार्य, संकटकाळात मदत आणि तरुणाईचा विश्वास या चतुःसूत्रीवर पूजा पाटील यांची उमेदवारी उभी आहे. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांसाठी ग्रुपने केलेल्या कार्यामुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास वाढला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून लवकरच पूजा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दत्तवाड मतदारसंघातील ‘खुला महिला’ गटाची ही लढत यंदा अत्यंत लक्षवेधी ठरणार असून, सहानुभूती, विकासकामांचा वारसा आणि संकटकाळातील मदतकार्याच्या आधारावर पूजा पाटील बाजी मारणार का..? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.