पंढरपुर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरकारने आमच्या तोंडा पाने पुसली आहेत. असा आरोप करत आता सकल मराठा समाजाने लोकप्रतिनिंना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथे ही सकल मराठा समाजाने आपला रोष व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. येत्या दि. 23 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे. या वारीला राज्यभरातून सात ते आठ लाख वारकरी येत असतात.कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते.

यावेळी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने, पूजा कोण करणार या विषयी संभ्रम आहे. त्यातच पंढरपूरमधील सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना रिकाम्या हाताने महापुजेला न येण्याचा सल्ला दिला आहे.


येत्या 23 नोव्हेंबरला एकादशी आहे तत्पूर्वी शासनाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. महापुजेला येताना सोबत अध्यादेश नसेल तर उपमुख्यमंत्र्यांना महापूजा करु दिली जाणार नाही. दबावतंत्राचा वापर करुन पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास, उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा भाजप नेते भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.