कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्लीन स्वीप मोहिमेत कारागृहाची झडती घेताना ५० हून अधिक मोबाइल सापडल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे. कळंबा कारागृहाची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येत आहे. तरीही असा प्रकार घडत असल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी तटबंदीची उंची २४ फूट करण्यात येणार आहे. त्यासह अवैधरीत्या मोबाइल वापरण्याची सवय संपविण्यासाठी कैद्यांना ॲलन स्मार्ट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाचा कार्यभार शामकांत चंद्रकांत शेडगे यांनी स्वीकारलाय. कार्यभार स्वीकारल्या नंतर त्यांनी तातडीने क्लीन स्वीप मोहिमेची सुरुवात केली आहे. सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात २२२० कैदी आहेत. कारागृहाची क्षमता १६९९ इतकी आहे. कारागृहात तंबाखूच्या १३ पुड्यांमध्ये २१४ ग्रॅम गांजा सापडल्यानंतर आता कैद्यांकडे ५० मोबाइल सापडल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. संबंधित कैद्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सध्या कारागृहाच्या तटबंदीची उंची १८ फूट आहे. ती ६ फुटांनी आणखी वाढविली जात आहे. या सहा फुटांत मोठी जाळी बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. कैद्यांना मदत करणाऱ्यांना वाढीव उंचीवरून मोबाइल, पुड्या फेकता येणार नाहीत. त्यातूनही साहित्य फेकले तर ते बरॅकच्या ऐवजी अंतर्गत रस्त्यावर पडेल, अशी काळजी घेतली जाणार आहे.