कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवोदिता घाटगे यांच्या झालेल्या २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये अर्धसत्यच बाहेर आले आहे. त्यामुळेच आमचा प्रयत्न पूर्णसत्य बाहेर येण्यासाठीच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी व्यक्त केले आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत याचा पाठपुरावा करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जोपर्यंत आरोपींच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत आणि नवोदिता घाटगे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणारच आहोत. लवकरात लवकर योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास प्रसंगी सर्वपक्षीय महिलांचा मोर्चाही काढण्याचा इशाराही पत्रकात दिला आहे.

समरजीत घाटगे यांचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. मग पैशाच्या मागणीचा फोन आल्या-आल्या त्यांच्या कानावर का घातले नाही आणि तसा गुन्हा का दाखल केला नाही ?. २० लाख रुपये दिल्यानंतर पोलिसात जाऊन तुम्हीच फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा विषय जनतेसमोर आल्यावर चर्चा तर होणारच. या विषयात तुम्ही एवढे भाऊक आणि हळवे होण्याची काही गरज नाही.

इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही तीन आठवड्यानंतर प्रसिद्धी पत्रक देत आहात. खरं तर पहिला फोन आल्या -आल्या २० लाख रुपये न देता तुम्ही पोलिसात गेला असता तर जनतेचे चांगले प्रबोधन झाले असते. या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रश्नच नाही आणि आमचा प्रयत्नही नाही. तुम्ही मात्र आमच्या नेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीत आणण्यासाठी काय -काय आकांडतांडव आणि खटाटोप केलेत हे सबंध जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहित आहे.

फसवणूक झाली म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्हाला पाठिंबा देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. तक्रार दाखल होऊन तीन आठवडे होत आले. तरीही पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या का आवळल्या नाहीत.

या प्रकरणाचा पूर्ण आणि सखोल तपास होऊन पूर्णसत्य बाहेर येईपर्यंत आणि तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणारच आहोत. येत्या आठवड्याभरात या प्रकरणी कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्वपक्षीय महिला मोर्चाही काढणार असल्याचेही फराकटे यांनी पत्रकात म्हटले आहे.