हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे प्रवेशद्वारच्या स्वागत कमानीसाठी प्रादेशिक पर्यटन खात्याकडून 86 लाखांचा निधी मिळाला होता. तो यासाठी न वापरता लोकनेते माजी खासदार कै. बाळासाहेब माने यांच्या नावाने अतिग्रे-रुकडी रस्त्यावर होत असणाऱ्या स्वागत कमानीसाठी वापरला जात आहे. यासाठी अतिग्रे ग्रामस्थांनी यासाठी शासनाकडे लेखी तक्रारीचे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यामुळे अतिग्रे ग्रामस्थांची अस्मिता पायदळी तुडवून ग्रामस्थांना विश्वासात न घेता अतिग्रे गावच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय दाबंगिरी वापरून परस्पर चुकीचा ठराव करून मान्यता कशी दिली. यासाठी संबंधित शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाला ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीचे निवेदन दिले होते. याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

यावेळी तानाजी पाटील यांनी, अतिग्रे गावाला महाराष्ट्र शासनाने क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळेच पर्यटन खात्याने गावच्या प्रवेशद्वारासाठी ८६ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गावच्या मुख्य वेशीवर ह्या स्वागत कमानीचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी आपण शासनाकडे ग्रामस्थांच्या सह्या घेऊन निवेदन दिले आहे. जर शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरून कायदेशीर मार्गाने जनआंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मेजर नितीन पाटील, शिलवंत बिडकर, आनंदा पाटील, महेश बिडकर, मेजर विजय पाटील, श्रीकांत बिडकर, परेश गावाने, विठ्ठल गुरव, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील उपस्थित होते.