घराणेशाहीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे भाष्य

बेंगळूर/प्रतिनिधी : देशात लोकसभेचे बिगुल वाजले आणि आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजप कॉंग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप करत आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनेकवेळा कॉंग्रेस हा परिवारवादी पक्ष असल्याच्या टीका होत असतात. दरम्यान, कर्नाटकात लोकसभेच्या उमेदवारीवरून पुन्हा वाकयुद्ध सुरु झालं आहे. तर कॉंग्रेस नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

कॉंग्रेसने २१ मार्चला लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जावयासह कर्नाटकातील काँग्रेसच्या पाच मंत्र्यांच्या मुलांची नावे आहेत. यावरुनच काँग्रेसला पुन्हा घराणेशाहीच्या टीकेला सामोरे जावे लागता आहे. भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस नेतृत्वावर टीका होत आहे. दरम्यान, रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर घराणेशाहीच्या प्रश्नावर भाष्य केले आहे.

सिद्धरामय्या म्हणाले की मंत्र्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट देणे हे घराणेशाहीचे राजकारण नाही. मतदासंघांतील मतदारांचा कल काय याचा विचार करून कार्यकर्ते आणि नेते यांच्या शिफारशी मान्य कराव्या लागतात. त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्यात येते, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामनी यांना कलबुर्गी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या कन्या प्रियंका यांना चिक्कोडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डी बेंगळूर दक्षिणमधून भाजपाचे विद्यमान खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध लढणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्या कन्या संयुक्ता पाटील बागलकोटमधून, तर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर बेळगाव आणि वनमंत्री ईश्वर खांद्रे यांचा मुलगा सागर खांद्रे बीदरमधून लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. राज्यसभेचे माजी उपसभापती के. रहमान खान यांचा मुलगा मन्सूर अली खान यांना बेंगळूर सेंट्रल तसेच एसएस मल्लिकार्जुन यांच्या पत्नी प्रभा मल्लिकार्जुन दावणगिरी येथून रिंगणात आहेत. तर उरलेल्या ४ मतदासंघांची यादी एक-दोन दिवसांत जाहीर होईल असे यावेळी सिद्धरामय्या यांनी सांगितलं.

२० जागांवर विजय मिळणार
“भाजपासारखे आम्ही सर्व २८ जागांवर निवडून येऊ असं खोटं बोलणार नाही, पण कर्नाटकात आम्ही किमान २० जागांवर विजय मिळवू असा विश्वास आम्हाला आहे. “भाजपा आणि जेडीएस यांची युती काँग्रेससाठी अडचणीची ठरेल का? या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले की त्यांची युती काँग्रेससाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे. यावर सविस्तर बोलण्यास मात्र त्यांनी टाळले.

“दिलेली आश्वासने पूर्ण करतो”
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की आम्ही राबवलेल्या पाच जनकल्याणकारी योजना लोकांना आवडलेल्या आहेत. त्यामुळे मतदारांना आम्ही आकर्षित केले आहे. त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत नक्कीच होईल. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी यावर्षी ३६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पुढील आर्थिक वर्षात ५२ हजार ९०० कोटी रुपये जनकल्याण योजनांसाठी राखून ठेवू. आम्ही भाजपासारखे खोटे बोलत नाही, आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. ते पुढे म्हणाले आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. कारण आम्ही दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करतो. भाजपासारखे खोटे बोलत नाही. भाजपा निवडणुकीत दिलेले कोणतेही वचन पाळत नाही. तसेच त्यांची अंमलजावणीही करत नाही, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.