कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानच्या वतीने कोल्हापुरात प्रथमत ‘ओम महामंत्र का उच्चारण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२३) शाहू स्मारक भवन येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आणि बुधवारी (दि. २४) सेंट्रल पंचायत हॉल, गांधीनगर, येथे संध्याकाळी ४.३० ते ७ या वेळेत विनामूल्य हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका अंजणा पवार यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

संचालिका अंजना पवार म्हणाल्या की, आज तरुणांमध्ये ब्लडप्रेशर, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी ओमचे उच्चारण हा या सर्व गोष्टींवर प्रभावी उपचार ठरत आहे. रोज सकाळी थोडा वेळ ओमचे उच्चारण केल्याने मानसिक शक्तींचा विकास होतो. दिवसभर मन प्रसन्न राहते. असेही त्यांनी यावेळी सांगितले. ओम उच्चारण तर सगळेच करतात पण विधिपूर्वक केलेल्या ओम उच्चारणाने आपल्या मानसिक शक्तीचा विकास होतो. आणि आपल्या प्रत्येक कार्यात सकारात्मक बदल होतो.

या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  संचालिका पवार यांनी केले आहे. यावेळी नरेश चोइथानी, विठ्ठल चोपदार, तुमेश्वर साहू, हरीश कंजनी, जय सुंदरानी आदी उपस्थित होते.